मुंबई : न्यूज कट्टा
बारामतीसह राज्यभरात गेल्या काही वर्षात बेकायदेशीर अकॅडमींनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शासनाची परवानगी नसताना गुणवत्तेच्या नावाखाली पालकांची लूट करण्याचा धंदाच अकॅडमींकडून सुरू आहे. त्यामुळं आता या अकॅडमीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणला जाणार आहे. त्यामुळं आता अकॅडमी या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या धंद्याला लगाम लागेल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
बारामतीत गेल्या काही वर्षात अकॅडमींकडून पालकांची मोठी लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी या अकॅडमींच्या माध्यमातून सुरू असलेल्या मनमानीचा पर्दाफाश करत राज्य शासनासह केंद्र सरकारकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या. या दरम्यान, त्यांनी अनेक आंदोलने करत या अकॅडमींना बंदी घालण्याची मागणीही केली होती.
दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने खासगी क्लासेस व अकॅडमींसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. मात्र प्रत्यक्षात याची राज्यात अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता राज्य शासन या अकॅडमींच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी पावले उचलण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेऊन राज्यात नवीन कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
नव्या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला असून येत्या पावसाळी अधिवेशात या कायद्याला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अकॅडमींच्या मानमानीला चाप बसेल असा विश्वास आता व्यक्त होऊ लागला आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर राज्यात सध्या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनेक अकॅडमींचा धंदा कायमस्वरूपी बंद पडणार आहे.





