BIG BREAKING : बारावीच्या परीक्षेसाठी भरारी पथक नेमूनही गैरप्रकार थांबेना; कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेचा बट्ट्याबोळ, भरारी पथकांचं बेकायदेशीर अकॅडमींना पाठबळ..?

बारामती : न्यूज कट्टा  

बारामतीसह विविध भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अकॅडमींचं पेव फुटलं आहे. गुणवत्तेच्या नावाखाली पालकांकडून भरमसाठ फी वसूल करणाऱ्या या अकॅडमींकडून परीक्षा काळात मोठे गैरप्रकार होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केली होती. त्यानंतर कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेअंतर्गत भरारी पथकं नेमण्यात आली. मात्र असं असूनही परीक्षेतील गैरप्रकार थांबत नसल्याने बेकायदेशीर अकॅडमींना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळं आता शासनाकडून कारवाई केली जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बारावीच्या परीक्षांना नुकतीच सुरुवात झाली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा काळात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असतात. त्यातून अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी या गैरप्रकारांबद्दल तक्रार करत कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यानंतर बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी राज्य शासनाकडून जिल्हा दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली. या पथकांना विविध परीक्षा केंद्रांना भेटीच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

स्थानिक पातळीवरही बैठे पथक स्थापन करत केंद्रनिहाय नेमणुका करण्यात आल्या आहेत. परंतु बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार अद्यापही सुरूच आहेत. गुणवत्तेच्या नावाखाली भरमसाठ फी वसूल करणाऱ्या आणि विविध शाळांमध्ये बोगस प्रवेश दाखवणाऱ्या अकॅडमींकडून या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले जात आहेत. अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी चालकांनी थेट भरारी पथकांशीच संगनमत केलं की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.

वास्तविक शालेय परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. असं असतानाही अनेक ठिकाणी, विशेषत: अकॅडमीचे विद्यार्थी असलेल्या परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. त्यामुळं शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेचा बट्ट्याबोळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यायानं अकॅडमी चालकांना मोकळं रान मिळत असून प्रशासनाने यांची गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत अशी मागणी मोहसीन पठाण यांनी केली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!