बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आणि नव्यानं नगरसेवकपदी निवडून आल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी कळवलं आहे. जय पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडून बारामती शहराची जबाबदारी कुणाला मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे.
जय पाटील यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपूर्वी बारामती शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या काळात त्यांनी पक्षाचे संघटन वाढवण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत प्रचार केला होता. त्याचवेळी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम अतिशय जोमाने राबवला. बारामती शहर राष्ट्रवादीचे प्रशस्त कार्यालय उभारणीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही जय पाटील यांच्यावर जबाबदारी कायम ठेवण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांनी आपल्या राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करताना पक्षातील विविध घटकांनी दिलेल्या सहकार्याबाबत आभार मानले आहेत.
दरम्यान, जय पाटील यांच्या राजीनाम्यानंतर बारामती शहराची धुरा कुणाकडे सोपवली जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या अनेकांची नावे समोर येत असली तरी शहराध्यक्षपदासाठी अचानकपणे आश्चर्यजनक नाव निश्चित केले जाऊ शकते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





