BIG BREAKING : निंबूत गटातून पार्थ किंवा जय पवार यांना उमेदवारी द्या; सतीशराव काकडे यांची अजितदादांसमोरच मागणी अन नवाब मलिक यांचाही दुजोरा

निंबूत : न्यूज कट्टा   

अजितदादांनी आजवर बारामती तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. सातत्याने त्यांनी विकासाला महत्व दिल्यामुळे बारामती तालुक्याचा कायापालट झाला आहे. त्यामुळंच विकासाची ही घौडदौड कायम ठेवण्यासाठी नव्या पिढीला संधी देणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत निंबूत गटातून युवा नेते पार्थ पवार किंवा जय पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शेतकरी नेते सतीशराव काकडे यांनी थेट अजितदादांकडे केली. त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे आता याबाबत अजितदादांचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती तालुक्यातील निंबूत येथील श्रीराम मंदिर, भैरवनाथ मंदिर आणि मदिना मस्जीदचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यास माजी मंत्री नवाब मलिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रामदास काकडे, संतोष सपकाळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सतीशराव काकडे यांनी एकाचवेळी मंदिर आणि मशिदीच्या उदघाटन कार्यक्रमामागील भूमिका विषद केली. कोणत्याही विकासकामासाठी अजितदादांनी सढळ हाताने मदत केली आहे. त्यातूनच निंबूत गावाचा कायापालट झालेला असल्याचे त्यांनी नमूद केले. बारामती तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे काम अजितदादांनी केले आहे. विकासाची ही प्रक्रिया निरंतर राहावी यासाठी आता अजितदादांनी पुढील पिढीला संधी द्यावी. त्यासाठी युवा नेते पार्थ पवार किंवा जय पवार यांना निंबूत गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

बारामतीसह अनेक भागात अजितदादांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळं आता नवीन पिढीही पुढे यायला हवी, त्यांनाही विकासाची ही प्रक्रिया लक्षात येण्यासाठी अजितदादांनी निर्णय घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं. सतीशराव काकडे यांच्या या मागणीला माजी मंत्री नवाब मलिक यांनीही दुजोरा दिला. त्यामुळं आता अजितदादा याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजितदादा तुम्हाला सोमेश्वरचं चेअरमन व्हावं लागेल                             

या मेळाव्यातच सतीशराव काकडे यांनी अजितदादा तुम्ही सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन होणार असं विधान केलं होतं. नंतर ते तुम्ही गंमतीत बोलल्याचं स्पष्ट केलं. परंतु सोमेश्वर कारखान्याचा सध्याचा कारभार लक्षात घेता तुम्हाला सोमेश्वर कारखान्याचं चेअरमन व्हावंच लागेल असं त्यांनी स्पष्ट करत सोमेश्वर कारखान्यात विशेष लक्ष घालण्याचा आग्रह केला. त्यांच्या या मागणीनंतर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!