BIG BREAKING : पुण्याच्या रूबी हॉल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार; उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेहच केला गायब

पुणे : न्यूज कट्टा   

पुणे शहरात प्रसिद्ध असलेल्या रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह काही काळ गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर असंतोष व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आता प्रशासन या रुग्णालयावर काय कारवाई करतं याकडे लक्ष लागलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवाशी सुनीता भगत (वय ५५) यांना उपचारासाठी दि. १८ जानेवारी रोजी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, दि. १९ जानेवारी रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून मृतदेह देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

कित्येक वेळ वाट पाहूनही प्रशासनाकडून मृतदेह ताब्यात मिळत नसल्यानं संतप्त नातेवाईकांनी जाब विचारल्यावर प्रशासनाची भंबेरी उडाली. या दरम्यान, अचानकपणे सुनीता भगत यांचा मृतदेह एका वेगळ्याच रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या आवारात आणण्यात आला. हा प्रकार समजल्यानंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मृतदेह नेमका कुठे होता..? तो दुसऱ्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात कसा आणला गेला..? असे अनेक सवाल नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत.

प्रशासनाला नातेवाईकांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरही देता आली नसल्याचे नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला असून आता पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!