मुंबई : न्यूज कट्टा
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आज विधानभवनाच्या लॉबीमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विधानभवनात आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली.
मागील काही दिवसांपासून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. आज याची परिणीती थेट विधानभवनाच्या लॉबीत मारहाण करण्यापर्यंत पोहोचल्याचं पहायला मिळालं. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सायंकाळच्या सुमारास आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते थेट विधानभवनाच्या लॉबीतच एकमेकांना भिडले. एकमेकांना धक्काबुकी करत त्यांनी अश्लील शिवीगाळ केली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी पुढे होत या कार्यकर्त्यांचा राडा शांत केला.
काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर हे विधानभवन परिसरात थांबलेले असताना जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर म्हणत त्यांना डिवचले होते. त्यानंतर काल हे दोघेही समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करण्याचा प्रकारही घडला होता. त्यानंतर आज दोन्ही बाजूचे कार्यकर्ते थेट विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडले. त्यामुळे हा वाद चांगलाच विकोपाला पोहोचल्याचं पहायला मिळत आहे.





