BIG BREAKING : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या घरी दरोडा; आई-वडिलांना बेशुद्ध करत पूजाला बांधून ठेवलं, घरातील नोकरांनीच केली चोरी

पुणे : न्यूज कट्टा

खासगी वाहनावर लाल दिवा लावणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यात दरोड्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असून घरातीलच एका नोकराने गुंगीचे औषध देऊन दरोडा टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती चतु:श्रृंगी पोलिसांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला असून तेथे पूजा खेडकर यांच्यासह त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर वास्तव्यास आहेत. याच बंगल्यात काही नोकरही राहतात. यापैकी एक नोकर अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळहून कामासाठी आला होता. रविवारी रात्री त्याने दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरातील मोबाईल फोन घेऊन तो नोकर पसार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर बांधलेल्या अवस्थेत असलेल्या पूजा खेडकर यांनी दाराच्या कडीचा उपयोग करून स्वतःचे हात मोकळे केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार कळवला. माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांचे पथक तातडीने खेडकर यांच्या घरी दाखल झाले. तेव्हा दिलीप आणि मनोरमा खेडकर हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

या घटनेबाबत पूजा खेडकर यांनी पोलिसांना प्राथमिक माहिती दिली असली, तरी अद्याप लेखी तक्रार दाखल केलेली नाही. मानसिक स्थिती ठीक झाल्यानंतर तक्रार देण्यात येईल, असं त्यांनी पोलिसांना कळवलं आहे. तसेच मोबाईल व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत का, याबाबतही सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार नोकराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. घरातील नोकराची पार्श्वभूमी, त्याचे कागदपत्रे आणि हालचाली यांचा सखोल तपास केला जात आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!