मुंबई : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून विधीमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता लोकभवनात उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेणार आहेत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या कामकाज पाहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर पक्षाचं नेतृत्व कुणाकडे जाणार याबद्दल चर्चांना सुरुवात झाली होती. काल दिवसभरात राजकीय घडामोडीनंतर रात्री उशीरा सुनेत्रा पवार याच पक्षाचं नेतृत्व करतील यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानुसार रात्रीच सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार हे मुंबईत दाखल झाले. आज दुपारी विधानभवनात राष्ट्रवादीची विधीमंडळ बैठक पार पडली.
या बैठकीच्या सुरुवातीला अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. त्यानुसार पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून आज सायंकाळी ५ वाजता लोकभवन येथे शपथविधी पार पडणार आहे.
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांनी आजवर सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामाचा ठसा उमटवतानाच अजितदादांची खंबीर साथ दिली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून संधी देण्यात आली. राज्यसभेतही त्यांनी तालिका सभापती म्हणून पाहिलं. त्याचबरोबर विविध संस्थांवरही त्या कार्यरत आहेत.
दु:ख विसरून पक्ष सावरण्यासाठी सरसावल्या
अजितदादांचं अकाली जाणं हे सर्वांनाच वेदना देणारं आहे. अशा परिस्थितीत अजितदादांच्या कुटुंबियांचं दु:ख कल्पनातीत आहे. मात्र काल दिवसभरातील राजकीय घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद घेण्यास होकार दिला. त्यानुसार आज त्यांची निवड झाली असून सायंकाळी त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
सुनेत्रा पवार यांचा अल्पपरिचय
वैयक्तिक माहितीचा तपशील
खासदार श्रीमती सुनेत्रा अजित पवार
राज्यसभा सदस्य
जन्मदिनांक : १८ ऑक्टोबर १९६३
जन्म ठिकाण : तेर, जि. धाराशीव (उस्मानाबाद), महाराष्ट्र
शिक्षण :
विद्यालयीन शिक्षण : महाराष्ट्र संत विद्यालय, तेर (बी.कॉम.)
महाविद्यालयीन शिक्षण : सरस्वती भुवन, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी
कौटुंबिक माहिती :
वडिल : कै. बाळीराव भगवंतराव पाटील
आई : श्रीमती द्रौपदी बाळीराव पाटील
पती : कै. अजित अनंतराव पवार
अपत्ये : एकूण २ मुलं
पार्थ अजित पवार, जय अजित पवार
कायमचा पत्ता : काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे
पत्रव्यवहाराचा पत्ता : सहयोग बंगला, सहयोग सोसायटी, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे
संपर्क क्रमांक – 02112 223100
छंद आणि विशेष आवड : जनसंपर्क, फोटोग्राफी, संगीत, चित्रकला
याआधी राज्यसभा सदस्य पदाचा कालावधी व समित्या :
राज्यसभा सदस्य (दि. 25 जून 2024 पासून आतापर्यंत)
राज्यसभा तालिका अध्यक्ष म्हणून काम
केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समिती : सदस्य
इतर महत्त्वाची कामे
चेअरपर्सन – बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, MIDC, बारामती
अध्यक्षा – Environmental Forum of India (NGO), बारामती
विश्वस्त – विद्या प्रतिष्ठान, बारामती
विश्वस्त – कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, कऱ्हाटी, ता. बारामती
विश्वस्त – बारामती क्लब, बारामती
विश्वस्त – कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्ट, बारामती (ज्येष्ठ नागरिक संघ)
सदस्य – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे
माजी सदस्य – व्यवस्थापन समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
माजी सिनेट सदस्य – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक अध्यक्षा – Maharashtra State Agri & Rural Tourism Federation (MART)
उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार
हिवरे देवस्थान ट्रस्ट तर्फे “श्रीमंत महासाधू श्रीमोऱया गोसावी जीवन गौरव पुरस्कार – 2021”
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – “जीवन गौरव पुरस्कार – 2023”
“ग्रीन वॉरियर पुरस्कार”, पुणे
लोकमत तर्फे “Outstanding Women Award”
लोकमत आयकॉन पुरस्कार, पुणे
ग्रामीण भागात महिलांसाठी सक्षमीकरण व पर्यावरण विषयक जनजागृतीबद्दल “ET Gen Next Icons” पुरस्कार
या व्यतिरिक्त उल्लेखनीय कामगिरी
आंतरराष्ट्रीय ग्रामीण उद्योजकता परिषद यशस्वी आयोजन
World Entrepreneurship Forum च्या सिंगापूर व फ्रान्स मधील बैठकीत सहभाग





