सातारा : न्यूज कट्टा
आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपण न्यायालयात धाव घेत असतो. मात्र न्यायाधीशच लाच घेऊ लागले तर काय असा प्रश्न मनात येण्यासारखी धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम व इतर तिघांनी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुण्यातील एका तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबंधित तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. जामिनासाठी मदत करण्यासाठी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि त्यांच्या साथीदारांनी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत संबंधित तरुणीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार १० डिसेंबर रोजी आनंद खरात, किशोर खरात आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीने पाच लाख रुपये गाडीत आणून देण्यासाठी सांगितलं. या दरम्यान, एका हॉटेलमध्ये पुणे व सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत लांचेची रक्कम स्वीकारताना संबंधितांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा सत्र न्यायाधीशानेच लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे न्याय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे न्यायपालिकेकडे संशयानं पाहिलं जात असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.





