पुणे : न्यूज कट्टा
रस्त्याच्या कामांचे बिल काढण्यासाठी लाच घेताना पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत या लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे. एकाचवेळी तीन अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, या कारवाईनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेतील बिलामागील टक्केवारीची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हे तिघेही पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. ते शासकीय कामे घेऊन त्यांच्या फर्मच्या माध्यमातून पूर्ण करत असतात.
बांधकाम विभागाकडून दौंड तालुक्यातील खुटबाव ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्ञानेश्वर कदम घर रस्ता या कामाची निविदा सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. तक्रारदारांना या दोन्ही कामांची वर्क ऑर्डरही मिळालेली होती. या कामांची रक्कम ४० लाख रुपये इतकी होत असून त्यासाठी तक्रारदारांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदेकडील एसक्युएम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल, त्यासाठी या कमिटीकरीता प्रत्येक कामापोटी ७ हजार रुपये असे दोन कामाकरिता १४ हजार रुपयांची लाच द्यावी लागेल असं कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी सांगितलं.
त्यानंतर तक्रारदार हे दत्तात्रय पठारे यांना भेटले. त्यांनी दोन कामाच्या बिलाची फाईल तपासून ती फाईल वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता बाबुराव पवार याच्याकडे पाठविण्यासाठी बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के रक्कम म्हणजेच ८० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी थेट कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांची भेट घेतली. त्यांनीही २ टक्क्यानुसार ८० हजार रुपयांची मागणी केली. या सर्व प्रकाराबाबत संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. ११ मार्च रोजी या तक्रारीची पंचासमक्ष शहानिशा केली. त्यामध्ये अंजली बगाडे यांनी १४ हजार रुपये, तसेच दत्तात्रय पठारे यांनी फाईल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी तडजोड करत ६४ हजार रुपयांची मागणी केली. बाबुराव पवार यांनीही ६४ हजार रुपयांत बिलाला मंजूरी देण्याचं मान्य केल्याचं सिद्ध झालं. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यामध्ये बाबुराव पवार यांनी ६४ हजार स्वीकारले. तसेच अंजली बगाडे यांनी त्यांना मिळणारे १४ हजार दत्तात्रय पठारे यांच्याकडे ठेवण्यास सांगितलं. त्यानुसार पठारेयांनी बगाडे यांचे १४ हजार आणि त्यांचे ६४ हजार असे ७८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
दरम्यान, कार्यकारी अभियंता बाबुराव पवार याच्या कार्यालयात ८ लाख ५८ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम जप्त केली आहे. तसेच या तिघांवर बंदगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रुपेश जाधव हे तपास करीत आहेत.





