बारामती : न्यूज कट्टा
दौंड येथील एका हत्या प्रकरणात बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणात चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह एकूण बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बारामतीच्या न्यायालयीन इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
संजीत जयप्रकाश टाक, सुजीत जयप्रकाश टाक, रवि जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश उर्फ छोटू दिपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मिकी, बबलू हिरालाल सरवान, सुरेश हिरालाल सरवान, मयुरी संजीत टाक, माधुरी सुजित टाक, शोभा किशोर वाल्मिकी, विकी नरेश वाल्मिकी (सर्व रा. दौंड, जि. पुणे) यांना बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दौंड शहरातील विनोद नरवार यांची ३ मे २०१८ रोजी हत्या झाली होती. विनोद नरवाल हे आपल्या पत्नी मीना नरवाल यांच्यासह दुचाकीवरून जात असताना संजीत टाक, सुजीत टाक, रवि टाक, रणजित टाक, आकाश उर्फ छोटू बेहोत, नरेश वाल्मिकी, बबलू सरवान, सुरेश सरवान, मयुरी टाक, माधुरी टाक, शोभा वाल्मिकी, विकी वाल्मिकी आणि इतर अनोळखी हल्लेखोरांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, दगडाने मारहाण केली.
यामध्ये विनोद नरवाल हे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस.आर. पाटील यांच्या समोर हा खटला चालला.
विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. प्रत्यक्षदर्शी, पुरावे व न्यायवैदयकीय पुरावे आणि आठ साक्षीदारांनी दिलेली साक्ष ग्राह्य मानत न्यायालयाने बारा जणांना जन्मठेपेची ठोठावली आहे. तसेच दंडाची रक्कम मीना नरवाल यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. मंगेश देशमुख तसेच कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव आत्माराम नलवडे व जी. के. कस्पटे, दौंड पोलिस ठाण्याच्या मनिषा अहिवळे यांनी सहकार्य केले.





