BIG BREAKING : बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ; नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित, विरोधकांचा सभात्याग

मुंबई : न्यूज कट्टा

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. लोणीकर यांनी माफी मागण्याची मागणी करत कॉँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनापर्यंत जाऊन राजदंडाला स्पर्श केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केले आहे. त्यानंतर कॉँग्रेसकडून सभात्याग करत सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.

पेरणीला नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला ६ हजार रुपये दिले. तुझ्या माय, बहिणी, बायकोच्या नावावर पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे, पायातले बूट-चप्पल आणि हातातलं मोबाइलचं डबडं आमच्या सरकारमुळे आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं होतं. त्यावर आज विधानसभेत कॉँग्रेसने आक्रमक भूमिका घेत लोणीकर यांनी माफी मागण्याची मागणी केली.

कॉँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी तीव्र संताप व्यक्त करत लोणीकर यांचा निषेध व्यक्त केला. तसेच ते थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाकडे गेले आणि राजदंडाला स्पर्श केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी अध्यक्षांची माफी मागावी, अशी मागणी केली. या सर्व गोंधळानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक दिवसासाठी नाना पटोले यांचे निलंबन करत असल्याचे जाहीर केले.

अध्यक्षांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सभात्याग करत सरकारवर हल्ला चढवला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आम्ही रोज शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, त्यासाठी सरकारकडून कितीही कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला. लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही मागणीदेखील त्यांनी केली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!