पुणे : न्यूज कट्टा
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष महानगरपालिका एकत्रित लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याच विषयावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणी कायमचं शत्रू नसतं किंवा कोणी कायमचं मित्रही नसतं असं म्हणत भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजकारणात काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात राज्यासह देशातील राजकारणात मोठ्या घडामोडींची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादांनी थेट भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या कारभाराचे पुराव्यानिशी वाभाडे काढले आहेत. त्याचवेळी दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकत्रित प्रचार करत असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कायमचं शत्रू किंवा कायमचं मित्र नसतं असं म्हणत अजितदादांनी भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया देताना सध्याच्या काळात राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.





