बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. ७ जुलै रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादा उद्या सकाळी पालखीचे दर्शन घेऊन ते काटेवाडीपर्यंत पायी चालत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दुपारनंतर अजितदादा पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.
मागील वर्षी अजितदादांनी पालखीच्या स्वागतासाठी हजेरी लावली होती. तसेच पालखी रथाचे सारथ्यही केले होते. यावर्षी अजितदादा वारकऱ्यांसमवेत पायी चालत पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. ना. अजित पवार हे सकाळी ८ वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभाग घेणार आहेत. पालखीचे दर्शन घेऊन ते काटेवाडीपर्यंत पायी चालणार आहेत. त्यानंतर दुपारची वेळ राखीव असून ते पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामती शहरात मुक्कामी आहे. उद्या पहाटे हा सोहळा सणसरकडे मार्गस्थ होणार आहे. दुपारचा विसावा काटेवाडीत होणार आहे. काटेवाडीत परंपरेनुसार धोतरांच्या पायघड्यांनी पालखीचं स्वागत होणार आहे. तर विसाव्यानंतर पालखी सणसरकडे निघताना काटेवाडीत मेंढ्यांचे रिंगण होणार आहे.





