नवी दिल्ली : न्यूज कट्टा
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे यावर्षी पालखी सोहळ्यात सहभाग घेणार आहेत. नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत राहुल गांधी यांच्या भेटीत याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार राहुल गांधी हे १४ जुलै रोजी पालखी सोहळ्यात सहभागी होतील अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी यांच्या वारीतील सहभागाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात नुकतीच वारीबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधी यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार राहुल गांधी यांनी १४ जुलै रोजी पालखी सोहळ्यात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्ष तयारी करत आहेत. अशात महाविकास आघाडीकडून राहुल गांधी हे वारीत सहभाग घेणार आहेत. तत्पूर्वी शरद पवार हेही पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मतांची पेरणी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.





