मुंबई : न्यूज कट्टा
आपल्या वाहनांवर ‘पोलिस’ अथवा पोलिस खात्याचं बोधचिन्ह टाकून मिरवण्याचं फॅड अलीकडे वाढलं आहे. यातून अनेक गैरप्रकार घडत असल्याची बाब समोर आली आहे. अशातच आता राज्यात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आपल्या खासगी वाहनांवर पोलिस लिहिल्याचं किंवा बोधचिन्ह आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन अधिनियमासह कायद्यातील तरतुदीनुसार अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खासगी वाहनांवर पोलिस लिहून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस लिहिलेल्या किंवा पोलिस बोधचिन्ह असलेल्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आपल्या खासगी वाहनांवर पोलिस किंवा बोधचिन्ह टाकता येणार नाही. तसं आढळल्यास मोटार वाहन अधिनियम आणि अन्य कायद्यांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
त्याचवेळी महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून मिरवणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींचे काटेकोर पालन करत ही कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स. अ. गिरी यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहिलेले किंवा ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावलेले आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार आहे. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता कोणत्याही वाहनावर पोलिस, महाराष्ट्र शासन अथवा पोलिस बोधचिन्हाचा वापर करता येणार नाही. तसे आढळल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे.





