बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना नियमबाह्यपणे फायर एनओसी देऊन त्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन अधिकाऱ्याची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे जिल्हा सहआयुक्त व्यंकटेश दुर्बास यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे.
बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमींना बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडून नियमबाह्य पद्धतीने फायर एनओसी देण्यात आल्या आहेत. या फायर एनओसी देताना नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी फायर एनओसी संदर्भातील कागदपत्रे मिळण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये रीतसर अर्ज दिला होता. परंतु आजपर्यंत ही कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत.
अग्निशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे मोहसीन पठाण यांनी बारामती नगरपरिषदेसमोर उपोषणही केले. त्यावेळी १९ जुलैपर्यंत संबंधित माहिती देण्याचं लेखी आश्वासन देत पठाण यांचं उपोषण थांबवण्यात आलं होतं. त्यानंतरही मोहसीन पठाण यांनी अग्निशमन विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र कुल्लरवार हे कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे दि. २५ जुलै रोजी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नोटीस काढत ४८ तासात संबंधित माहिती देण्याचे आदेश दिले होते.
मुख्याधिकाऱ्यांनाही न जुमानता कुल्लरवार यांनी आजवर ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे मोहसीन पठाण यांनी राज्याच्या नगरविकास विभागासह जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. याची दखल घेत नगरविकास विभागाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्बास यांनीही या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आणि त्याचा अहवाल सात दिवसांत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मुख्याधिकारी महेश रोकडे या प्रकरणात कारवाई करतात की या अधिकाऱ्याला पाठीशी घालतात हे पहावे लागेल.





