BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना ‘फायर एनओसी’; बारामती नगरपरिषदेसमोर उपोषणाला सुरुवात, नगरपरिषद प्रशासनाला जाग येणार का..?

बारामती : न्यूज कट्टा   

बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना नियमांची पायमल्ली करत ‘फायर एनओसी’ देणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. बारामती नगरपरिषदेसमोर पठाण यांनी उपोषण सुरू केले असून प्रशासन आता तरी जागे होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींविरोधात मोहसीन पठाण यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. मागील वर्षी प्रशासनाने फायर ऑडिट नसलेल्या अकॅडमी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र ऑडिट नसलेल्या एकाही अकॅडमीवर कारवाई झाली नाही. उलट बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाद्वारे या अकॅडमींना फायर एनओसी देण्यात आले. त्यामुळे प्रशासनातील अधिकारीच या अकॅडमींना पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या एनओसीबाबत मोहसीन पठाण यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कागदपत्रांची मागणी केली होती. वेळोवेळी पाठपुरावा करूनही ही कागदपत्रे मोहसीन पठाण यांना दिली गेली नाहीत. त्यामुळे नियमांची पायमल्ली करत बेकायदेशीर अकॅडमींना अर्थपूर्ण सहकार्य करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करत पठाण यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

नेमकं गौडबंगाल काय..?

वारंवार पाठपुरावा करूनही अग्निशमन विभागाचे अधिकारी माहितीच देत नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या आदेशानंतरही हे अधिकारी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत आहेत. गेली अनेक महीने त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतरही ते कागदपत्रे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या संपूर्ण एनओसी प्रकरणात नेमके गौडबंगाल काय आहे याचा शोध घेणे आवश्यक असून यात काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे का याचीही चौकशी करावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

अधिकाऱ्यांना खास गिफ्ट

प्रशासनातील अधिकाऱ्यांना शहरातील बेकायदेशीर अकॅडमींकडून ‘गिफ्ट’ दिले जात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप मोहसीन पठाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे प्रकरण नगरविकास विभागाच्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बारामती नगरपरिषदेशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!