बारामती : न्यूज कट्टा
बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमींना नियमबाह्य पद्धतीने फायर एनओसी देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहाय्यक अग्निशमन पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांना बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नोटीस दिली आहे. येत्या ४८ तासात आवश्यक ती माहिती तक्रारदार मोहसीन पठाण यांना द्यावी असे या नोटीसीद्वारे कळवले आहे.
बारामती शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अकॅडमींचं पेव फुटलं आहे. शासनाची कोणतीच परवानगी न घेता आणि शासनाला कोणत्याही स्वरूपात कर न देता खुलेआम गुणवत्तेच्या नावाखाली पालकांची लूट करण्याचा धंदाच या अकॅडमींकडून सुरू आहे. या अकॅडमींकडून अनेक विद्यार्थ्यांची फीसाठी अडवणूक करण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी या अकॅडमींच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
मागील वर्षी या अकॅडमींबद्दल आंदोलन केल्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. ज्यामध्ये फायर ऑडिट नसलेल्या अकॅडमी कायमस्वरूपी बंद केल्या जातील असा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात बारामती शहरातील अकॅडमींना नियमबाह्य पद्धतीने फायर एनओसी देण्यात आल्या. विशेष म्हणजे या एनओसी देताना कोणत्याच नियमाचे पालन केले नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे मोहसीन पठाण यांनी माहिती अधिकारात या एनओसीसंदर्भातील कागदपत्रे मागितली होती.
बारामती नगरपरिषदेचे सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार हे ही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेष म्हणजे ही माहिती देण्याबाबत नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि बारामती नगरपरिषदेकडून अनेकदा सूचनाही देण्यात आली. मात्र वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पद्मनाभ कुल्लरवार यांना नोटिस बजावत येत्या ४८ तासात मोहसीन पठाण यांनी मागितलेली सर्व माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
कुल्लरवार यांची टाळाटाळ कशामुळे..?
पद्मनाभ कुल्लरवार हे बारामती नगरपरिषदेत सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोहसीन पठाण हे फायर एनओसीबाबत रीतसर माहिती मागत आहेत. मात्र कुल्लरवार यांच्याकडून टाळाटाळ केली जात असल्याने शंका उपस्थित होत आहे. पारदर्शक काम असेल तर कोणतीही माहिती देण्यास विलंब लागत नाही. मात्र कुल्लरवार यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे अशी चर्चा आता होत आहे.





