BIG NEWS : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीत पक्षाशी इमान राखणार की विमान उडवणार..?

इंदापूर : न्यूज कट्टा

सध्या होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांना संधीच मिळाली नाही. त्यामुळे आता इंदापूर विधानसभेत पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे पक्षाशी ‘इमान’ राखतात की कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत अपक्ष उभे राहून ‘विमान’ उडवतात याकडेच आता लक्ष लागले आहे.

बारामतीला लागून असलेल्या इंदापूर तालुक्याचं राजकारण नेहमीच चर्चेत राहिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील सख्य तर सर्वश्रुतच आहे. त्यातच मागील अनेक निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना थेट राष्ट्रवादीच्या विरोधाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.

हर्षवर्धन पाटील यांनी कॉँग्रेसमधून बाहेर पडत भाजपशी घरोबा केला. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षात अजितदादांनीही भाजपशी हातमिळवणी करत महायुतीत सहभाग घेतला आहे. त्यामुळे आता इंदापूरमधून विधानसभेला उमेदवारी कुणाला मिळणार हा प्रश्न चर्चेत आला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका जाहीर करत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार केला होता.

मागील काही दिवसात हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातून इंदापूर विधानसभेचा गुंता सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र प्रत्यक्षात हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळालीच नाही. त्यातच आता विद्यमान आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांनाच पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून उभे राहावं अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.

मागील इतिहास पाहता हर्षवर्धन पाटील हे अनेकदा ‘विमान’ या चिन्हावर निवडणूक लढले आहेत. याचाच संदर्भ घेत कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही सुरू केली आहे. पक्षाकडून विचार होणार नसेल तर आपलं विमानच बरं अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. अशात आता हर्षवर्धन पाटील हे भाजप पक्षाशी ‘इमान’ राखणार की आगामी निवडणुकीत अपक्ष उभे राहून ‘विमान’ उडवणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!