BIG NEWS : नीरा नदीत स्नान करताना १५ वर्षीय मुलगा गेला वाहून; आजीसोबत वारीत झाला होता सहभागी

इंदापूर : न्यूज कट्टा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. आजीसोबत वारीत सहभागी झालेला १५ वर्षीय मुलगा नदीत स्नानासाठी गेल्यानंतर पाण्यात वाहून गेला आहे. सराटी ते अकलूज दरम्यानच्या नीरा नदीवरील बंधाऱ्यावर आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून या मुलाचा शोध घेतला जात आहे.

गोविंद कल्याण फोके (वय १५, रा. झिरपी, ता. अंबड, जि. जालना) असं या मुलाचं नाव आहे. गोविंद हा आपल्या वृद्ध आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्यासोबत पायी वारी करत होता. आज पहाटेच्या सुमारास नीरा नदीकिनारी तो स्नानासाठी गेला होता. त्यावेळी नदीत उतरल्यानंतर तो अचानक पाण्याच्या भोवऱ्यात अडकला आणि वाहून गेला. ही घटना पाहून त्याच्या आजीने आरडाओरड केली.

जवळच कर्तव्यावर असलेल्या मोरगाव येथील होमगार्ड जवान राहुल अशोक ठोंबरे यांनी तात्काळ नदीत उडी मारत दोनवेळा गोविंदचा हात पकडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रचंड वेग आणि भोवऱ्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ठोंबरेदेखील दूर फेकले गेले. या घटनेनंतर स्थानिक बचाव पथकासह एनडीआरएफचे जवानांकडून शोधकार्य सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अभिजीत कणसे यांनी दिली.

दरम्यान, घटनेनंतर गोविंदची आजी परेगा खराबे यांचा आक्रोश हृदयद्रावक होता. ही आमची दुसरी वारी होती. आम्ही दोघंही एकत्रच आंघोळीला नदीकाठावर आलो. पण पाण्यात उतरल्यावर तो अचानक वाहून गेला. मी ओरडले, मदतीसाठी लोक धावले, पण तो सापडला नाही, असं सांगत त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!