पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा
गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या आजाराचा संसर्ग झालेल्या पिंपरी चिंचवडमधील एका ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.
गेल्या काही दिवसात पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराने अनेक रुग्णांना ग्रासले आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी चिंचवडमधील एका ६४ वर्षीय महिलेला १७ नोव्हेंबर रोजी गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. त्यामुळे तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने या महिलेला २४ नोव्हेंबर रोजी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यानच्या काळात या महिलेला न्यूमोनियाची लागण झाली. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच दि. २१ जानेवारी रोजी या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह पुण्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





