मुंबई : न्यूज कट्टा
राज्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने ही निवड केली. दरम्यान, महायुतीने मिळवलेल्या जोरदार यशानंतर शपथविधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला किती मंत्रीपदे मिळतात याकडे लक्ष लागले आहे.
बारामतीत अजितदादांनी १ लाखांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. त्याचवेळी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यात ४१ जागा निवडून आल्या आहेत. तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ नेतेपदी अजितदादांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, आज अजितदादांसह राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन केले. आगामी पाच वर्षात मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे करण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दुसरीकडे महायुतीकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्रीपदाची संधी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्रीपद कोणाला मिळेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.





