BIG NEWS : बारामतीच्या लखोबा लोखंडेचा आणखी एक उद्योग; पुण्यात अलिशान फ्लॅट देण्याच्या अमिषानं सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लावला दीड कोटींना चुना..!

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा 

बारामतीचा लखोबा लोखंडे अर्थात आनंद सतीश लोखंडे याच्या उद्योगांची मालिका थांबता थांबत नाही. त्यानं वेगवेगळी आमिषं दाखवत अनेकांना गंडा घातल्याची उदाहरणे असतानाच आता पुण्यातील एका अलिशान फ्लॅटच्या व्यवहारात सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या या व्यवहारात या लखोबाने संबंधितांकडून दीड कोटी रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले आणि नंतर फ्लॅटच दिला नसल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

पुण्यातील वाघोली परिसरात एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा सदनिका प्रकल्प आहे. या प्रकल्पात सातव्या मजल्यावर १४०० चौरस फूटांचा फ्लॅट सैन्यदलातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला पसंत पडला होता. त्यांनी या फ्लॅटच्या व्यवहाराबाबत चौकशी केल्यानंतर बारामतीचा लखोबा लोखंडे हा व्हेंडर म्हणून समोर आला. त्यानं ३ कोटी ३३ लाख रुपयांना या फ्लॅटचा व्यवहार केला. त्यापोटी दीड कोटी रुपये स्वत:च्या नावाने धनादेशाद्वारे स्वीकारले.

या व्यवहारातील उर्वरीत रक्कम तीन टप्प्यात देऊन फ्लॅटचा ताबा ३१ जुलै २०२४ पर्यंत देण्याचं ठरवण्यात आलं. तसेच संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्यानंतर या फ्लॅटची नोंदणी संबंधित खरेदीदारांच्या नावाने करण्यात येईल असा करार करण्यात आला. १५ सप्टेंबरपर्यंत हा व्यवहार पूर्ण करून फ्लॅट नावावर केला जाईल असेही या करारात नमूद करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या खरेदीदारांना हा फ्लॅटच मिळाला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

बारामतीच्या लखोबा लोखंडेने या सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दीड कोटींना टोपी टाकली असून त्यांना आता त्यांची रक्कम मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. बारामतीच्या जवळच्या नेत्याशी संबंध असल्याचं सांगत या लखोबाने अनेक ठिकाणी टोप्या टाकण्याचं काम केलं आहे. त्याच्या अनेक कारनाम्यांची चर्चा झडत आहेत. अशात आता सैन्यदलातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची लखोबाने दीड कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लखोबाच्या अनेक तक्रारी

लखोबानं केलेल्या उद्योगांमुळे त्याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये फसवणुकीसह आर्थिक घोटाळ्याचे प्रकार अधिक आहेत. आपण संबंधित नेत्यांचं सर्व कामकाज पाहतो, आर्थिक विषयही माझ्याकडेच असतात असं सांगणाऱ्या या लखोबाने फसवणुकीतून मोठ्या प्रमाणात माया जमवली आहे. त्याच्या या उद्योगांबद्दल अनेक ठिकाणी तक्रारी दाखल असल्या तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळं या लखोबा आणि त्याच्या टीमच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!