BIG NEWS : छत्रपती साखर कारखान्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; येत्या गुरुवारी अजितदादा घेणार इच्छुकांच्या मुलाखती

बारामती : न्यूज कट्टा

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: मुलाखती घेणार आहेत. गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी या मुलाखती होणार असून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि माजी नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची तब्बल दहा वर्षांनंतर निवडणूक होत आहे. कारखान्याला उर्जितावस्था आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची साद घातली आहे. विशेष म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी कारखान्याची धुरा पृथ्वीराज जाचक यांच्याकडे देण्यात येणार असल्याचेही अजितदादांनी जाहीर केले आहे. अजितदादांच्या या भूमिकेला खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं छत्रपती कारखान्याची निवडणूक जारी झाली तरी ती एकतर्फी होईल अशीच शक्यता आहे.

तब्बल दहा वर्षांनंतर निवडणूक होत असल्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी अजितदादा इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. बारामती शहरात या मुलाखती होणार असून त्यासाठीचे ठिकाण लवकरच निश्चित केले जाईल अशी माहिती पृथ्वीराज जाचक आणि किरण गुजर यांनी दिली आहे. या मुलाखतीनंतर छत्रपती कारखान्यात कुणाला संधी मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!