बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
दुग्ध व्यवसायातील एका कंपनीला बारामतीतील एका व्यवसायिकाने तब्बल १० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळच्या तालुक्यातील नेत्यांचा खंदा समर्थक आणि युवा उद्योजक म्हणून मिरवणाऱ्या बारामतीतील लखोबा लोखंडेचा यामध्ये समावेश आहे. आर्थिक फसवणुकीप्रकरणी या लखोबासह त्याच्या तथाकथित कंपनीतील सहकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, या लखोबाने अनेकांना विविध आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याची प्रकरणे आता चर्चेत येवू लागली आहेत.
बारामतीत विविध क्षेत्रात कंपन्या स्थापन करून आपण मोठे व्यावसायिक असल्याचं आव आणणाऱ्या या लखोबाने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचं समोर येत आहे. त्यानं आपण एका नेत्याच्या किती जवळचे आहोत, निवडणुकीत त्यांचे आर्थिक व्यवहार आपणच पाहत असतो अशा बतावण्या करून अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याची प्रकरणे समोर येवू लागली आहेत. अशातच या लखोबानं एका दूध व्यवसायातील कंपनीला तब्बल १० कोटी रुपयांना गंडा घातल्याची बाब समोर आली आहे.
या लखोबाने आपल्या डेअरी व्यवसायाशी संबंधित कंपनीच्या नावावर मुंबईतील एका कंपनीकडून एका आठवड्यात रक्कम देण्याचं आश्वासन देऊन तब्बल २ कोटी रुपयांचं लोणी खरेदी केलं. दरम्यानच्या काळात या कंपनीकडून दूध पुरवठ्यासाठी म्हणून तब्बल ९३ लाख रुपये घेतले. तसेच या कंपनीकडून दूध व्यावसायिकांना अतिरिक्त फायदा देण्यासाठी म्हणून ६ कोटी ४३ लाख रुपयांची बनावट बिले सादर केली. प्रत्यक्षात ही रक्कम कंपनीला मिळालीच नाही.
याच काळात या लखोबाने तुम्हाला दूध पावडर पुरवतो असं सांगून या कंपनीशी संबंधित अन्य कंपनीकडून ३२ लाख रुपये उकळले. त्यानंतर संबंधित कंपनीने माल नेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील एका प्रकल्पावर वाहन पाठवले. मात्र चार दिवस वाहन थांबूनही कोणताही माल मिळाला नाही. त्यानंतर कंपनीच्या संचालकांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं लक्षात आलं. याबाबत संबंधित लखोबाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यानं संबंधितांना रक्कम अदा केली नाही.
या दरम्यान, या लखोबाने संबंधितांना धनादेश दिले. मात्र ते वटलेच नाहीत. त्यामुळे संबंधित लखोबा केवळ फसवणूक करत असल्याचं लक्षात आल्यानंतर या कंपनीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित लखोबासह त्याच्या कंपनीशी संबंधितांची चौकशी करून जबाबही घेतले आहेत. त्यामुळं या लखोबासह त्याची टोळी लवकरच जेरबंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण हा लखोबा
दरम्यान, या लखोबाने बारामती आणि परिसरात एकाच नावानं वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून, त्या माध्यमातून आपण मोठे युवा उद्योजक आहोत असं भासवलं. तसेच बारामतीशी संबंधित काही नेत्यांसोबत आपले खास संबंध असून त्यांचं सगळं कामच आपण पाहतो अशी बतावणी करत या भामट्याने अनेकांना गंडा घातल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.





