मुंबई : न्यूज कट्टा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ५९ लाख भगिनींना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांसाठी ४७८७ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण दि. २९ सप्टेंबर रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमातून केलं जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी सुरू ठेवण्यात आली आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या जवळपास १ कोटी ५९ लाख भगिनींच्या खात्यात यापूर्वीच जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या हप्त्याची अर्थात सप्टेंबर महिन्यांसाठीची रक्कम जमा करण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्रुटींमुळे ज्या महिलांना लाभ मिळाला नाही, त्यांनाही या महिन्यात रक्कम अदा केली जाणार आहे.
२९ सप्टेंबर रोजी रायगड येथे लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. या कार्यक्रमात सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर वितरीत करण्यास सुरुवात केली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
तिसऱ्या हप्त्यात २ कोटी महिलांना मिळणार लाभ
रायगडमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल केलेल्या लाभार्थी महिलांना लाभ वितरीत केला जाणार आहे. यापूर्वी १ कोटी ५९ लाख लाभार्थी महिलांना या योजनेच्या जुलै व ऑगस्ट महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे. आता जवळपास २ कोटी महिलांना या योजनेतून लाभ देण्यात येणार असल्याचंही आदिती तटकरे यांनी सांगितलं.
हे आहेत निकष
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी महिलांनाच दिला जातो.
- योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळेल, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
- २१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- जर महिलेच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा कर भरत असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.





