नागपूर : न्यूज कट्टा
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. या दोन्ही पक्षांचे आमदार महायुतीत येणार असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार शिंदे गटाच्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अजितदादांच्या संपर्कात आहेत. काहीच दिवसात या सगळ्या गोष्टी समोर येतील असा दावा त्यांनी केला आहे.
उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकारणात विशेषत: महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षात फाटाफुट झाल्यास त्याचा मोठा परिणाम राज्याच्या राजकारणात होणार आहे. त्याचवेळी हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असणार आहे.
दरम्यान, यापूर्वीही अनेकांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबद्दल असे दावे केले आहेत. अशातच आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या दोन्ही पक्षांबाबत मोठा दावा करत काही दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतात की उदय सामंत यांचा दावा फोल ठरणार याकडे लक्ष लागले आहे.





