बारामती : न्यूज कट्टा
राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून लढणार नाहीत अशी चर्चा होती. स्वत: अजितदादांनी याबाबत संकेत दिले होते. तसेच कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर बारामतीकरांच्या मनातला उमेदवार देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानुसार आता बारामतीतून स्वत: अजितदादा निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बारामती शहर आणि तालुक्यात अजितदादांचे प्रचाररथही आता फिरू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून लढण्याबाबत साशंकता व्यक्त केली होती. सलग ३० वर्षे काम केल्यानंतर आता फारसा रस राहिला नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं बारामतीकरांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या दौऱ्यांवेळी कार्यकर्त्यांकडून अजितदादांच्या उमेदवारीचा आग्रह केला जात होता.
अजितदादा बारामतीत उमेदवार नसतील तर भविष्यात मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धाकधूक कार्यकर्त्यांसह सामान्य बारामतीकरांमध्ये निर्माण झाली होती. विकासपुरुष म्हणून ओळख असलेल्या अजितदादांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांनी अक्षरश: त्यांचा ताफा अडवत उमेदवारी जाहीर करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावर बारामतीकरांच्या मनातलाच उमेदवार देऊ असं सांगत अजितदादांनी आपल्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स कायम ठेवला होता.
विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी केली जात असतानाच आता बारामती शहर आणि तालुक्यात अजितदादांच्या प्रचाराची वाहने फिरू लागली आहेत. त्यामुळे बारामतीतून अजितदादांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.





