चाकण : न्यूज कट्टा
पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहत परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. एका स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. यामध्ये या व्यवस्थापकाच्या पोटात आणि पाठीत गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर चाकण परिसरात खळबळ उडाली आहे.
अजित विक्रम सिंग (वय ४०, रा. हिंजवडी) असं या गोळीबारात जखमी झालेल्या व्यवस्थापकाचं नाव आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आज सकाळी अजित सिंग हे चाकण औद्योगिक वसाहतीतील वराळे येथील कैलास स्टील कंपनीच्या आवारात उभे होते. यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये सिंग यांच्या पोटात आणि पाठीत दोन गोळ्या घुसल्या. त्यामुळे सिंग हे जागेवरच कोसळून पडले.
या घटनेनंतर कंपनीच्या कामगारांनी तात्काळ त्यांना जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल केले. मात्र गोळ्या पोटात आणि पाठीत गेल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. व्यक्तिगत वादातून ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
चाकण परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली असून उद्योजक, कामगार यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेतील आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या सीसीटीव्हींचा आधार घेतला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.





