पुणे : न्यूज कट्टा
गेल्या काही दिवसात पुणे शहरात गुइलेन बॅरे सिन्ड्रोम या आजाराने नागरीकांची धाकधूक वाढवली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. सध्या या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. काहीजणांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यात जीबीएस आजाराचे दहा रुग्ण सध्या व्हेंटीलेटरवर असल्याची माहितीही पुढे आली आहे.
मंगळवारी पुण्यात गुइलेन बॅरे सिन्ड्रोम या आजाराचे २२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. आता या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ही संख्या आता २४ वर पोहोचली असून यातील १० रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्याचेही माहिती पुढे आली आहे. यात लहान मुले आणि तरुण रुग्णांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांबरोबरच आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढली आहे.
काय आहे आजार..?
गुइलेन बॅरे सिन्ड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. या आजारात स्नायूंमध्ये अशक्तपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेण्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. अशक्तपणा आणि हातपाय मुंग्या येणे हे या आजाराचे लक्षण आहे. तसेच अंग दुखी, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, अन्न खाताना त्रास होणे, हात-पाय लूळ पडणे अशीही या आजाराची लक्षणे आहेत.





