बारामती : न्यूज कट्टा
अंतिम फायर एनओसी नसलेल्या आणि अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नसलेल्या बारामती शहरातील अकॅडमी तात्काळ सील करण्याचे आदेश दि. २९ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिले होते. या आदेशाला महिना उलटूनही अद्याप कोणत्याच अकॅडमीवर कारवाई झालेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. बारामतीत अनेक अकॅडमी बेकायदेशीरपणे सुरू असून अंतिम फायर एनओसी नसतानाही त्यांना अभय दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बारामती शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अकॅडमी सुरू आहेत. त्यांच्याकडून गुणवत्तेच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. या अकॅडमींवर कारवाई व्हावी यासाठी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी वेळोवेळी आंदोलनं केली. दरम्यानच्या काळात प्रशासनाकडून सर्व विभागांची बैठक घेऊन फायर एनओसी नसलेल्या अकॅडमींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
प्रशासनाच्या आदेशानंतर शहरातील अकॅडमी चालकांनी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत कायदेशीर बाबींची पूर्तता नसतानाही फायर एनओसी मिळवल्या होत्या. त्यावर मोहसीन पठाण यांनी या एनओसीसंदर्भातील कागदपत्रांची माहिती अधिकारात मागणी केली होती. मात्र अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्षभर ही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या फायर एनओसी देताना काहीतरी काळेबरे झाल्याचा संशय व्यक्त करत मोहसीन पठाण यांनी बारामती नगरपरिषदेसमोर उपोषणही केले होते.
याबाबत मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांना ना हरकत दिल्याची मुदत संपूनही अंतिम एनओसी न घेतलेल्या आणि अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नसलेल्या अकॅडमी तात्काळ सील करण्याचे आदेश दि. २९ ऑगस्ट रोजी दिले होते. शहरातील सर्व अकॅडमींची तपासणी करून आवश्यक सुरक्षेची पूर्तता होईपर्यंत संबंधित अकॅडमी सील कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र महिना उलटल्यानंतरही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.
मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
बारामतीतील अकॅडमींवर कारवाई करावी असा आदेश असतानाही अग्निशमन विभागाकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचं या अधिकाऱ्यापुढे काहीच चालत नाही अशीच चर्चा आता होत आहे. वास्तविक आदेशानंतर तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्याचं धाडस संबंधित निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी दाखवलं आहे. त्यामुळं अग्निशमन विभागातील या अधिकाऱ्यांच्या मनमानीमागे नेमकी कारणे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.





