अक्कलकोट : न्यूज कट्टा
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकत त्यांना मारहाणीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी अक्कलकोट पोलिसांकडून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण गायकवाड हे सोमवारी अक्कलकोट येथील सकल मराठा समाज व श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यावेळी कार्यक्रमस्थळाकडे जात असताना शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई ओतली. तसेच गायकवाड यांना मारहाणीचा प्रयत्न केला.
प्रवीण गायकवाड यांना त्यांच्या वाहनातून बाहेर काढून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनाच्या काचेवर दगड मारून नुकसान करण्यात आले. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी दशरथ भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे (रा. भवानीनगर, इंदापूर), कृष्णा क्षीरसागर (रा. कसबा, बारामती, जि. पुणे), अक्षय चव्हाण (रा. तांदूळवाडी, बारामती, जि. पुणे), बाबू बिहारी (रा. तांदूळवाडी, बारामती, जि. पुणे), भवानेश्वर बबन शिरगिरे (रा. इंदापूर, जि. पुणे) या सात जणांवर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव हे करत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांचे ठिकठीकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच पंढरपूरमध्ये त्यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. सामाजिक चळवळीतून हजारो तरुणांना उद्योजकतेकडे नेणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.





