नवी दिल्ली : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना पहिल्याच टर्ममध्ये राज्यसभेत मोठी जबाबदारी मिळाली आहे. राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
गेल्यावर्षी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काहीच महिन्यात त्यांच्यावर राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या नवीन जबाबदारीची माहिती देत अभिनंदन केले आहे.
राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा..! असं सुनील तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
https://x.com/SunilTatkare/status/1886638670276649038
सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात निर्मलग्राम योजना राबवत आपल्या समाजकारणाला सुरुवात केली. बारामती येथे टेक्सटाईल पार्कची उभारणी करत त्यांनी हजारो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षण व जनजागृतीसह जलसंधारण, ओढा खोलीकरण अशा अनेक कामांची चळवळ उभी केली आहे. विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
राज्यसभेतील तालिका अध्यक्ष (Panel of Vice-Chairpersons) यांची जबाबदारी :
सभापतींच्या अनुपस्थितीत अध्यक्षपदाची जबाबदारी:
- राज्यसभेचे सभापती (उपराष्ट्रपती) अनुपस्थित असताना, उपसभापती देखील अनुपस्थित असल्यास, तालिका अध्यक्षांपैकी एकजण सभेचे संचालन करतो.
सभेचे सुयोग्य संचालन:
- चर्चेला सुव्यवस्थित व नियंत्रित ठेवणे.
- सभासदांना बोलण्यासाठी संधी देणे आणि वेळेचे नियोजन करणे.
- गोंधळ निर्माण झाल्यास सभागृहाचे शिस्तबद्ध संचालन करणे.
कामकाज नियमांचे पालन:
- राज्यसभा नियमावलीनुसार कामकाज पार पडते याची खात्री करणे.
- सभागृहात चर्चेच्या मर्यादा व शिस्त राखण्यासाठी आवश्यक ते निर्देश देणे.
विधेयक आणि प्रस्तावांवर चर्चा व निर्णय:
- विधेयकांवर चर्चा सुरू ठेवणे आणि आवश्यक असल्यास मतदान प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करणे.
- विवादास्पद मुद्द्यांवर सभागृहात समन्वय साधण्याचा प्रयत्न करणे.
सभागृहातील सदस्यांचे अनुशासन:
- सभागृहात सदस्यांनी नियमांचे पालन करावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे.
- अनुचित वर्तन झाल्यास संबंधित सदस्यांना समज देणे किंवा कारवाई सुचवणे.
लोकशाही प्रक्रियांचे पालन:
- सदस्यांना त्यांच्या मतप्रदर्शनासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणे.
- विविध गटांमध्ये समतोल साधून सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडेल याची काळजी घेणे.
तालिका अध्यक्ष हे राज्यसभेच्या संसदीय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि सभेचे कार्य सुरळीत चालावे यासाठी आवश्यक ते निर्णय घेतात.





