बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरासाठी नविन पाणीपुरवठा योजनेसाठी नगरोत्थान महाभियान योजनेतून ९६ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावकरांना वाढीव पाणीपुरवठा योजना देणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानुसार त्यांनी पुढाकार घेत या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद करत आपला शब्द पूर्ण केला आहे.
माळेगावचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून नागरीकरणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये या अनुषंगाने वाढीव पाणीपुरवठा योजना राबवण्याचा अजितदादांचा मानस होता. त्याबद्दल अजितदादांनी माळेगावकरांना शब्द देत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माळेगाव नगरपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल केला होता.
या प्रस्तावाला नगरोत्थान महाभियानाच्या राज्यस्तरीय प्रकल्प समितीने मान्यता देण्यात आली आहे. नगरोत्थान महाभियान योजनेतून या योजनेला मंजूरी देत ९६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. अजितदादांनी माळेगावसाठी नविन पाणीपुरवठा योजना मंजूर करत आपल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
माळेगावचा वाढता विस्तार लक्षात घेता नविन पाणीपुरवठा योजना फायदेशीर ठरणार आहे. त्यातून माळेगावकरांना मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे माळेगावच्या नागरीकांनी अजितदादांचे आभार मानले आहेत.





