मुंबई : न्यूज कट्टा
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. गेले काही दिवस मविआमध्ये छोटा भाऊ, मोठा भाऊ असं सूत्र असेल असं सांगितलं जात होतं. मात्र आज जाहीर झालेल्या जागावाटपामध्ये तीनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर उर्वरीत १८ जागा या मित्र पक्षांना दिल्या जाणार असल्याचं आज जाहीर करण्यात आलं.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जागावाटपाचं सूत्र अंतिम करण्यात आलं. यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कॉँग्रेस असे तीन पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर उर्वरीत १८ जागा मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, आम्ही तीनही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर लढण्याचे निश्चित केले आहे. तर उर्वरीत १८ जागा आम्ही मित्र पक्षांना देणार आहोत. या जागांबाबत संबंधित पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर याबाबत माहिती दिली जाईल. शेकाप, समाजवादी पार्टी अशा मित्रपक्षांचा यात समावेश आहे. राज्यभर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र सामोरे जावून ही निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत वेगवेगळ्या चर्चा झडत होत्या. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता उर्वरीत १८ जागांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे लक्ष लागले आहे.





