शिरूर : न्यूज कट्टा
शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील विवाहितेच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात फिर्याद देणाऱ्या पतीनेच पत्नीला मारहाण करत शॉक देऊन खून केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण घटनेची उकल झाली आहे. पोलिसांनी आता या आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
शीतल स्वप्नील रणपिसे (वय २१) असं या मृत विवाहितेचं नाव आहे. तर स्वप्नील शामराव रणपिसे (वय २६) असं खून करणाऱ्या पतीचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार दि. ३ जुलै रोजी शीतल रणपिसे हिचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला होता. दोरीने गळा आवळून व शॉक देऊन तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं होतं. याबाबत तिचा पती स्वप्नील रणपिसे याने फिर्याद दिली होती.
घरात कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने शीतलचा खून केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिरूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. यामध्ये घटनास्थळ व आजूबाजूला पाहणी करत चौकशी करण्यात आली.
यातून पोलिसांना मृत विवाहितेचा पती स्वप्नील याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीच्या खूनाची कबुली दिली. ती सतत कुणासोबतही माझी तुलना करायची. त्यातूनच आमच्यात वाद होत होते. आम्ही दोघेही एकमेकांवर संशय घेत होतो. बुधवारी घरात कोणीही नसताना नायलॉनच्या दोरीने तिचा गाला आवळला. त्यात ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिच्या अंगठ्याला वायर गुंडाळून शॉक देऊन तिचा खून केल्याची कबुली स्वप्नीलने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील रणपिसे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अधिक तपास शिरूर पोलिस करीत आहेत.





