भवानीनगर : न्यूज कट्टा
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करतानाच कारखान्याची धुरा पुढील पाच वर्षांसाठी पृथ्वीराज जाचक यांच्याकडे देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. याला आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे पाठिंबा दर्शवला आहे. कोणत्याही सहकारी संस्थेत राजकारण न आणता शेतकरी हिताचा निर्णय घेतला जात असेल तर आमचा या गोष्टीला पाठिंबाच असेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या कारखान्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या काही काळापासून या कारखान्याची अवस्था डबघाईला आली आहे. अशातच या कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजितदादांनी या कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याशी मनोमिलन करत पुढील पाच वर्षे अध्यक्षपद जाचक यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
आगामी काळात हा कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर काढून पुन्हा चांगले दिवस आणण्याचा निर्धार अजितदादांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत अजितदादांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. अशातच आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांच्या लासुर्णे येथील निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अजितदादांनी श्री छत्रपती कारखान्याबाबत घेतलेल्या निर्णयाला सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा व्यक्त केला. शेतकऱ्यांशी संबंधित संस्थेत राजकारण न आणता सर्वांना एकत्र घेऊन एखादा निर्णय होत असेल तर तो शेतकऱ्यांच्या हिताचाच ठरेल. त्यामुळं पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वात कारखान्याचा कारभार चालणार असेल तर आम्ही विरोध करण्याचं कारण नाही असंही त्यांनी नमूद केलं.
अजितदादांनी श्री छत्रपती कारखान्याची परिस्थिती बदलण्यासाठी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यातच सहकारातील जाणकार व्यक्तिमत्व असलेल्या पृथ्वीराज जाचक यांच्याकडे कारखान्याची धुरा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला आता खुद्द सुप्रिया सुळे यांनीच पाठिंबा दर्शवल्यामुळे आगामी काळात या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल अशीच शक्यता निर्माण झाली आहे.





