मुंबई : न्यूज कट्टा
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबरोबरच मित्रपक्षांच्या सत्तेतील सहभागाबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे चर्चा करणार आहेत. या बैठकीतच मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे फडणवीस यांना संधी देतात की ऐनवेळी धक्कातंत्र वापरतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत मोदी-शाह यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य असेल असं सांगत मुख्यमंत्रीपदावरील दावा मागे घेतला. त्यानंतर दिल्लीत आज दुपारी साडेचार वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह मित्र पक्षांना सत्तेत मिळणारे स्थान निश्चित केले जाणार आहे.
महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती मिळू शकते अशी चर्चा आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत आपली भूमिका जाहीर करत सरकार बनवताना आपला कोणताही अडसर ठरणार नाही असं स्पष्ट केलं. असं असलं तरी राज्यातील सध्याचं वातावरण लक्षात घेता मोदी-शाह यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की अन्य कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन नवीन मुख्यमंत्री निवडला जाऊ शकतो. त्यामुळे आज दिल्लीत होत असलेली बैठक महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर राज्यातील नवीन मंत्रीमंडळाबाबतही या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात दिल्लीत होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.





