बारामती : न्यूज कट्टा
दूध व्यवसायातील कंपनीला १० कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी बारामतीच्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद सतीश लोखंडे याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता त्याच्याविरोधात विविध ठिकाणी दाखल असलेल्या तक्रारींबाबत चौकशीला वेग येणार आहे. अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या लखोबाच्या उद्योगांचा पर्दाफाश या निमित्तानं होणार असून त्याच्या अडचणी वाढणार आहेत.
बारामतीजवळ असलेल्या एका मतदारसंघातील नेत्याची जवळीक सांगून बारामतीच्या लखोबा लोखंडेने अनेक उद्योजकांना गंडवले आहे. एवढ्यावरच न थांबता त्यानं काही अधिकाऱ्यांनाही चुना लावला आहे. त्याने अनेकांना वेगवेगळी आमिषं दाखवत आर्थिक फसवणुकीचा धंदाच सुरू केला होता. त्याचे अनेक कारनामे गेल्या काही दिवसांत समोर आले आहेत. त्यानंतर आता मुंबईतील एका कंपनीची १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यानच्या काळात, आनंद लोखंडे याच्याविरोधात छत्तीसगढ राज्यातील रायपूर पोलिस ठाणे, दिल्ली आणि पुण्यातील कार्पोरेट व्यवहार विभाग, पुणे पोलिस, मुंबई पोलिस अशा विविध ठिकाणी आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी मुंबईत त्याच्यावर पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता अन्य ठिकाणी दाखल असलेल्या तक्रारींच्या चौकशीलाही वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





