BIG NEWS : भोसरीत पाण्याची टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा  

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील सदगुरूनगर परिसरात पाण्याची टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज पहाटे ही घटना घडली असून अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेत काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोसरी येथील सदगुरूनगर परिसरात लेबर कॅम्पमध्ये बांधकाम कामगार वास्तव्यास आहेत. या कामगारांना आंघोळ करण्याची सोय व्हावी यासाठी येथील ठेकेदाराने १० ते १२ फुट उंचीवर पाण्याची टाकी बांधली होती. आज सकाळी काही कामगार टाकीखाली आंघोळ करत असताना या टाकीच्या बांधकामाचा ढाचा कोसळला. त्यामध्ये हे कामगार गाडले गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एनएनसीएल या कंपनीचा हा लेबर कॅम्प असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी सांगितलं आहे. तर या घटनेस जबाबदार दोषींवर कारवाईचे आदेण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत सूचना दिल्या आहेत. भोसरीच्या सद्गुरू नगर परिसरातील पाण्याची टाकी कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुर्घटनेत पाच ते सात कामगार टाकीखाली अडकल्याची भीती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!