पुणे : न्यूज कट्टा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांचीही मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती. मात्र पंकज देशमुख यांनी या बदलीविरोधात कॅटमध्ये धाव घेतली. त्यानंतर त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली करत मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुणे शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. मात्र दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाल्यामुळे पंकज देशमुख यांनी कॅट (केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरण) मध्ये धाव घेत या बदलीविरोधात दाद मागितली होती.
आज न्यायाधिकरणात याबाबत सुनावणी झाली. त्यामध्ये पुढील आदेश होईपर्यंत पंकज देशमुख यांनाच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एखाद्या अधिकाऱ्याची मुदतपूर्व बदली करताना कारण देणे आवश्यक आहे. पंकज देशमुख यांची बदली करताना कोणतेही कारण दिलेले नाही. विशेष म्हणजे पंकज देशमुख यांची सात महिन्यांपूर्वीच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे पंकज देशमुख हेच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत राहणार असून याबाबत पुढील सुनावणी १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.





