मुंबई : न्यूज कट्टा
राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या विविध योजनांच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेचं आयोजन करत राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. उद्या अजितदादा धुळे, जळगाव जिल्ह्यासह मालेगाव दौऱ्यावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याच्या सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटनांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यामुळे दक्षता घेण्याबाबत सतर्क करण्यात आले आहे.
राज्याच्या अंतरीत अर्थसंकल्प जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांच्या निमित्तानं राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही यात्रा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातून सुरू झालेली ही यात्रा आज कोल्हापूरमध्ये आहे. उद्या ही यात्रा खानदेशातील धुळे, जळगाव या जिल्ह्यात असणार आहे. उद्या होत असलेल्या दौऱ्यादरम्यान धोक्याची शक्यता गुप्तवार्ता विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
धुळे, जळगावसह मालेगाव भागात दहशतवादी संघटनांच्या संशयास्पद हालचाली सुरू आहेत. त्यातून घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे या भागात दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगण्याच्या आणि अजितदादांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलिस यंत्रणाही सतर्क झाल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने अधिकच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.





