मुंबई : न्यूज कट्टा
महायुती सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४६ वरून ५० टक्के होणार आहे. जुलै महिन्याच्या पगारात वाढीची रक्कम अदा केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. केंद्र शासनाने महागाई भत्ता जाहीर केल्यानंतर ही वाढ केली जाते. त्यामध्ये १ जानेवारी आणि १ जुलै अशा दोन टप्प्यात ही वाढ होत असते. त्यानुसार आज राज्य शासनाने आदेश काढत १ जुलैपासून ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने केलेली ही वाढ शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद, अनुदानित संस्था या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, ही वाढ जुलै महिन्याच्या पगारात अदा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निमित्ताने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून मोठे गिफ्ट देण्यात आल्याचे बोलले जात आहे.





