बारामती : न्यूज कट्टा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाबरोबर युती करतानाच भाजपलाही काही जागा दिल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या सुखदेव हिवरकर यांनी शिर्सुफळ पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुखदेव हिवरकर यांनी राष्ट्रवादीकडे शिर्सुफळ गणातून उमेदवारी मागितली होती. मात्र वाटाघाटीत ही जागा भाजपला देण्यात आली. त्यामुळं सुखदेव हिवरकर यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या गणात राष्ट्रवादीचे पारडे जड असताना वाटाघाटीसाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिर्सुफळ गण हा जिरायत म्हणून ओळखला जाणारा भाग आहे. भाजपचं प्रस्थ वाढत असताना गावोगावी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे दोन गट राहिले आहेत. त्यामुळं स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणं आवश्यक होतं. मात्र ऐनवेळी ही जागा मित्रपक्षाला दिल्यामुळे संपूर्ण गणात नाराजी असल्याचं सांगून सुखदेव हिवरकर यांनी आपण पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं.
वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करूनही संधी मिळणार नसेल तर अपक्ष निवडणूक लढवणे हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळंच या भागातील सामान्य जनतेच्या साथीने आपण ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या गणात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्याचावेळी ओबीसी मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं हिवरकर यांची उमेदवारी राष्ट्रवादीसह मित्रपक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.





