BREAKING NEWS : पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या इंदापूरच्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; सहाजण गंभीर जखमी

वाई : न्यूज कट्टा

वाई तालुक्यातील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या इंदापूर तालुक्यातील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा पर्यटक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात दोघेजण बेशुद्ध पडल्याचीही माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, परफ्यूमच्या वासामुळे मधमाशांचं पोळे विचलित झालं. त्यातून ही हल्ल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील पांडवगड येथे विविध भागातील पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील काही पर्यटक आज सकाळी या गडावर गेले होते. त्यावेळी अचानक मधमाशांच्या जथ्थ्याने या पर्यटकांवर हल्ला चढवला. त्यामध्ये दोघेजण जागेवरच बेशुद्ध पडले. तर उर्वरीत चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

आल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळ दंडवते, चैतन्य देवळे आणि संतोष जापे अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. हे सर्वजण इंदापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाई पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाई येथील रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, पर्यंटकांपैकी काहींनी परफ्यूम वापरले होते. या परफ्यूमचा उग्र वास आल्यामुळे मधमाशांचे पोळे विचलित झाले. त्यातून मधमाशांनी अचानक गडावरील पर्यटकांवर हल्ला चढवला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!