BREAKING NEWS : सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी होणार गोड; गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला ३४०० रुपये अंतिम दर

सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा  

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला ३४०० रुपये इतका अंतिम दर जाहीर केला आहे. त्यानुसार सभासदांच्या खात्यावर प्रतिटन २२६ रुपये आणि ठेवींवरील व्याज असे एकूण २९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमेश्वर कारखान्याने अंतिम ऊसदर जाहीर करत रक्कम जमा केल्याने सभासदांची दिवाळी गोड होणार आहे.

सन २०२४-२५ या हंगामात सोमेश्वर कारखान्याने १२ लाख २४ हजार ५२४ टन उसाचे गाळप केले. त्यामध्ये प्रतिटन ३१७३ रुपये सभासदांना यापूर्वीच अदा करण्यात आले आहेत. आज कारखान्याने ३४०० रुपये अंतिम दर देण्याचा निर्णय घेत सोमेश्वर मंदिराच्या कामांसाठी १ रुपया प्रतिटन विकास निधी वजा करून २२६ रुपये प्रतिटन प्रमाणे होणारी रक्कम सभासदांच्या खात्यात वर्ग केली आहे. ऊस बिलापोटी २५ कोटी आणि ठेवींवरील व्याजाचे ४ कोटी असे एकूण २९ कोटी रुपये सभासदांना अदा करण्यात आले आहेत.

आडसाली उसाला प्रतिटन ३४०० रुपये, पूर्वहंगामी उसाला ३४७५ रुपये, सुरू आणि खोडवा उसाला ३५५० रुपये प्रतिटननुसार रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. आगामी गळीत हंगामात सोमेश्वर कारखाना सभासद आणि गेटकेन असा मिळून सुमारे १४ लाख टन उसाचे गाळप करणार आहे. गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून पाच महिन्यात प्रतिदिन साडेनऊ हजार टन क्षमतेने गाळप केले जाणार असल्याचेही जगताप यांनी नमूद केले.

येत्या हंगामात ऊस वाहतुकीसाठी बैलगाडी, डंपिंग ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांचा करारही करण्यात आला आहे. तसेच मजुरांची टंचाई लक्षात घेऊन कारखान्याने पहिल्यांदाच २४ हार्वेस्टरचा करार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात पाच फूटी पट्टा पद्धत अवलंबावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!