छत्रपती संभाजीनगर : न्यूज कट्टा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही उद्या दिल्लीत जाणार आहोत. त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब होईल असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडेल असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अजितदादांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महायुतीला दिलेल्या यशाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानताना सत्ता स्थापनेबाबत उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीसाठी अजितदादांसह एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहे.
दिल्लीत होणाऱ्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह मंत्रीमंडळाबाबत चर्चा होणार आहे. खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार सत्तेत येणार असून उद्याच्या बैठकीनंतर त्याला अंतिम स्वरूप येईल असंही अजितदादांनी सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्राच्या नवीन सरकारच्या शपथविधीबाबत विचारलं असता येत्या तीन ते चार दिवसात म्हणजेच ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल असे संकेत अजितदादांनी दिले आहेत.





