दिंडोरी : न्यूज कट्टा
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. धडक झाल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अल्टो कार थेट नाल्यात कोसळली. त्यामुळं कारमधील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. तर दोनजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
देविदास पंडित गांगुर्डे (वय २८), मनीषा देविदास गांगुर्डे ( वय २३) व भावेश देविदास गांगुर्डे (वय २, तिघेही रा. सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक), उत्तम एकनाथ जाधव (वय ४२), अलका उत्तम जाधव (वय ३८, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी) आणि दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय ४५) व अनुसया दत्तात्रेय वाघमारे (वय ४०, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील मंगेश यशवंत कुरघडे ( वय २५) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय १८) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट शेजारीच असलेल्या नाल्यात जाऊन कोसळली. कारमधील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन सातही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातातील मृत हे नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथून गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.





