बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातल्या कांबळेश्वर इथल्या कलाकारांनी एकत्र येत सुरू केलेल्या ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ या धम्माल विनोदी वेबसिरीजला जगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. सामाजिक विषय, मुद्देसूद मांडणी आणि तितक्याच खुमासदार पद्धतीनं होणारं सादरीकरण यामुळं या वेबसिरीजनं २२ लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा ओलांडला आहे.
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील भरत शिंदे, रामदास जगताप आणि सुभाष मदने हे त्रिकुट आज मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गेली अनेक वर्षे पथनाट्याच्या माध्यमातून गावोगावी जनजागृतीचं काम करणाऱ्या या गावाकडच्या मातीत रुळलेल्या कलाकारांसाठी कोरोनाचा काळ विशेष संधी देणारा ठरला आणि जगभरातील प्रेक्षकांपुढे आली ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ ही धम्माल विनोदी वेबसिरीज.
सुरुवातीला मोबाईलमध्ये चित्रीकरण करत सामाजिक विषयांवर विनोदी पद्धतीनं सादरीकरण करत या कलाकारांनी जम बसवला. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील निष्णात सहकाऱ्यांची साथ मिळाली आणि बघता बघता या वेबसिरीजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आज या वेबसिरीजनं २२ लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला आहे. आजवर या वेबसिरीजचे २८५ भाग प्रसारीत झाले असून ९६ कोटी ९५ लाख ९० हजार ६२२ व्ह्युज मिळाल्या आहेत.
गाव पातळीवरील राजकारणापासून समाजातील अनेक ज्वलंत विषयांवर परखड भाष्य करत जनजागृती करणारी ही वेबसिरीज आहे. कांबळेश्वरसारख्या छोट्या गावातून आलेल्या या कलाकारांनी सुरू केलेली ही वेबसिरीज जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. वेबसिरीजमधील नियमितता, प्रसिद्धीपेक्षा जनजागृतीला दिलेलं महत्व आणि प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम यामुळं २२ लाखांचा टप्पा गाठणं शक्य झाल्याचं या वेबसिरीजचे कलाकार आवर्जून सांगतात.
मायबाप प्रेक्षकांच्या पाठबळामुळेच आम्ही आहोत. त्यामुळं प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार नाही ही काळजी घेऊनच आम्ही सर्व विषयांचं सादरीकरण करतो. यापुढील काळातही विनोदाच्या माध्यमातून जनजागृतीचा हा जागर अव्याहतपणे सुरू ठेवू असंही या कलाकारांकडून आवर्जून सांगण्यात आलं. चांडाळ चौकडीच्या करामती आणि गावरान फिल्म प्रॉडक्शनच्या संपूर्ण टीमचं मन:पूर्वक अभिनंदन..!





